---Advertisement---
जळगाव : सकल ब्राह्मण समाजाच्या एकजुटीचे प्रतीक ठरणारा भगवान श्री परशुराम जन्मोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जळगावातून सुरू झालेली ही चळवळ आज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली असून गावोगावी जन्मोत्सवाचे भव्य आयोजन केले जात आहे.
यंदा जन्मोत्सवाचे १७ वे वर्ष असून सलग सतराव्या वर्षीही भव्य स्वरूपात कार्यक्रम पार पडणार आहे. आयोजनाच्या यशस्वीतेसाठी ४०० हून अधिक स्वयंसेवक श्रमदान करत असून दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.
जन्मोत्सवाची सुरुवात ५ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराने झाली. पुढील प्रमुख आकर्षण म्हणून रविवार, १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महाबळ चौकातून हजारो युवकांच्या सहभागात विराट मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली काव्यरत्नावली चौक, रिंगरोड, शास्त्री टॉवर, सुभाष चौक, पांडे डेअरी चौक, वीर सावरकर पुतळा मार्गे पोलीस मल्टीपरपज हॉल येथे समाप्त होईल. सायंकाळी ७ वाजता याच ठिकाणी दानदाते व श्रमदाते गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मुख्य कार्यक्रम रविवार, १९ एप्रिल रोजी होणार असून सकाळी ९ वाजता श्रीराम मंदिरात परशुराम पूजन होईल. दुपारी ४.३० वाजता सुभाष चौकातून भव्य शोभायात्रेला प्रारंभ होईल. पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम, दांडिया पथकांसह आणि भगवान परशुरामांच्या भव्य रथासह हजारोंच्या उपस्थितीत ही शोभायात्रा काढली जाणार आहे. महिलांचे तलवारबाजी व दांडपट्टा प्रात्यक्षिक हे विशेष आकर्षण ठरणार आहे. शोभायात्रेचा समारोप शिवतीर्थ येथे होईल.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले आहेत. निमंत्रण पत्रिकेऐवजी २८ पानी मराठी नववर्ष दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली असून त्यात तिथी, परंपरा आणि ब्राह्मण समाजाच्या मुळ कुळांची माहिती देण्यात आली आहे.
या आयोजनाबाबत माहिती देताना अध्यक्ष अॅड. ओम त्रिवेदी यांनी वर्षभर विविध व्याख्यानमाला व स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत श्रीकांत खटोड, नितीन पारगावकर, पंकज पवनीकर, सुरेंद्र मिश्रा, राजेश नाईक, शिव शर्मा, गोपाल पंडित तसेच महिला संघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
एकूणच, मोठ्या उत्साहात आणि एकात्मतेच्या भावनेतून यंदाचा परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सर्व तयारी पूर्णत्वाकडे गेली आहे.









