जळगाव रेल्वे स्थानकावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी; प्रवाशांच्या सोयींसाठी विविध प्रश्नांवर भुसावळ रेल्वे मंडळाला निवेदन

---Advertisement---

 

जळगाव : प्रवाशांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडीया यांनी भुसावळ रेल्वे मंडळाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांची भेट घेत जळगाव रेल्वे स्थानकासंदर्भातील विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करत निवेदन सादर केले.


जळगाव रेल्वे स्थानकावरील मुख्य प्रवेशद्वाराजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ वाढलेल्या अतिक्रमणामुळे प्रवाशांना तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अतिक्रमणामुळे वाहनतळ व्यवस्था विस्कळीत होत असून सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित अतिक्रमण तात्काळ हटवून महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने समन्वय साधावा अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे मंडळाच्या बांधकाम विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


याशिवाय, जळगाव रेल्वे स्थानकावर गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली बॅटरी कार सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा लाभ होत असल्याने ही सेवा लवकर सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले असून पुढील महिन्यात ती सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.


प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ६ वर सरकता जिना (एस्कलेटर) बसविण्याची मागणी करण्यात आली. तसेच रेल्वे सुरक्षा दल (RPF) स्थानकात महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.


यासोबतच 12142 पाटलीपुत्र एक्सप्रेसला जळगाव येथे थांबा देण्यात यावा, जळगाव रेल्वे स्थानकासाठी स्वतंत्र चारचाकी वाहनतळ उभारण्यात यावा, तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरील शिवाजीनगर बाजूस जनरल तिकीट काऊंटर सुरू करण्यात यावा, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या.


या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून संबंधित विभागांकडून लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---