---Advertisement---
मन्यारखेडा येथील विश्वातील एकमेव मानले जाणारे ग्रह-राशी नक्षत्र मंदिर सध्या धार्मिक उत्साहाने गजबजले असून वैशाख स्नानासाठी हजारो भाविकांनी येथे हजेरी लावली. मंदिर परिसरातील सर्व तीर्थकुंड भक्तांसाठी खुले करण्यात आल्यानंतर या पवित्र कुंडांमध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली.
या तीर्थकुंडांचे उद्घाटन श्री गुरु ब्रह्मावधूत डॉ. स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. चारधाम, अष्टभुवैकुंठ, १२ ज्योतिर्लिंग आणि ६८ तीर्थांतील पवित्र माती व जल या कुंडांमध्ये विधीपूर्वक विसर्जित करण्यात आले असून त्यानंतर हे कुंड भक्तांसाठी खुले करण्यात आले. यामुळे या स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने २८ मार्चपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत बद्रीनाथ धामाचे माजी धर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच कीर्तन सप्ताहात संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांच्यासह राज्यातील नामांकित कीर्तनकारांनी कीर्तन सेवा दिली.
उत्सवाचा समारोप १० एप्रिल रोजी होणार असून, सकाळी १० ते १२ या वेळेत बद्रीनाथ मंदिर संस्थानचे गादीपती प.पू. श्री मयूरगोविंदजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर ‘बदरीविशाल भंडारा’ आयोजित करून या भव्य धार्मिक सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.
या संपूर्ण धार्मिक उत्सवामुळे मन्यारखेडा परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित दिसत आहे.









