---Advertisement---
शहराच्या सौंदर्यीकरणाला गती देण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी कडक भूमिका घेतली असून, पावसाळ्यापूर्वी सर्व प्रमुख चौक आणि दुभाजकांचे सुशोभीकरण पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. गुरुवारी (९ एप्रिल) त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
एकसंध आणि आकर्षक शहररचना
शहरातील प्रत्येक चौक व दुभाजक सुशोभित करताना एकरूपता आणि आकर्षकता राखली जावी, यावर महापौरांनी भर दिला. दुभाजकांची उंची, रिफ्लेक्टर्स आणि वृक्षारोपण एकसारखे असावे, तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर शहराची सकारात्मक छाप पडेल, अशा पद्धतीने डिझाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अतिक्रमण हटवण्याचे आदेश
सुशोभीकरणाच्या कामांमध्ये अडथळा ठरणारी चौक परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंगची जागा राखून दुभाजक उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विकासकांना अल्टिमेटम
बैठकीत विविध विकासकांनी सादरीकरण केले. मात्र, काही ठिकाणी काम सुरू न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत संबंधित विकासकांना ८ दिवसांची मुदत देण्यात आली. अन्यथा काम दुसऱ्या संस्थेकडे सोपवण्याचा इशारा देण्यात आला.
या मार्गांचा होणार कायापालट
शहरातील टॉवर चौक–महापालिका इमारत, शिवतीर्थ चौक–नंदिनीबाई विद्यालय, स्वातंत्र्य चौक–आकाशवाणी चौक, कावरत्नावली चौक–माबळ स्टॉप, डी-मार्ट–रामानंदनगर, मेहरूण–एकनाथ नगर, तसेच सिंधी कॉलनी चौक–पिंपराळा उड्डाणपूल या प्रमुख मार्गांचा सुशोभीकरणातून कायापालट होणार आहे.
मेंटेनन्सची जबाबदारी निश्चित
काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांवरच राहणार आहे. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि विजेचे खांब अडथळा ठरत असल्यास त्यांचे स्थलांतर करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या.
बैठकीस उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, तसेच महापालिकेचे अधिकारी, विकासक आणि संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.









