---Advertisement---
पाचोरा : येथील पाचोरा-वरखेडी रोडवर अवैध गौण खनिजची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर गौण खनिज पथकाने कारवाई केली. यावेळी पथकास शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या आदेशाने ७ एप्रिल रोजी रात्री वडगाव आंबे येथील तलाठी सागर मोरे (वय-३२, रा. चाळीसगाव) अवैध गौण खनिज प्रतिबंधक पथकात ड्यूटीवर होते. यावेळी त्यांच्यासोबत वाडी तलाठी अमोल शिंदे, कासम पुरा तलाठी प्रदीप काळे, बांबरुड (प्र.पा) महादेवचे तलाठी अज्मलशा मकानदार आदी होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास हे पथक जळगाव चौफुलीकडे जात असतांना त्यांना पुढे एक अवैध वाळू वाहतुक करणारे डंपर पाचोरा शहराकडून वरखेडीकडे जातांना आढळून आले.
डंपर थांबवून चालकाकडे वाळु वाहतुकीचा परवानाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने परवाना नसल्याचे सांगितले. व वाहनाच्या खाली उतरुन डंपर तेथेच सोडून काढला. त्यानंतर तेथे एक पांढऱ्या रंगाच्या कार मधून आलेल्या शुभम गुजर याने पथकातील अधिकाऱ्यांना गाडी खाली झोपायचे आहे का? असे बोलुन जिवे मारण्याची धमकी दिली तसेच धक्काबुक्की देवुन कॉलर पकडुन शिवीगाळ केली.
याप्रकरणी तलाठी सागर मोरे यांच्या फिर्यादीवरुन डंपर चालकासह शुभम गुजर याच्याविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी करीत आहे.
१२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पथकाने केलेल्या या कारवाईत १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे डंपर आणि ३० हजार रुपये किमतीची ५ ब्रास वाळू असा १२ ला ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.









