---Advertisement---
ज्या मुलीची हत्या झाली म्हणून तिच्या वडिलांनी आणि भावाने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली, तीच तरुणी अचानक जिवंतपणे पोलीस ठाण्यात हजर झाल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळबळ उडाली असून, पोलिसांसमोर आता अनेक अनुत्तरीत प्रश्न निर्माण झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी जळगाव जामोद परिसरातील राजुरा धरणाजवळ एका अज्ञात तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. याच दरम्यान, खगनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी गावातील शिवानी कळमेकर (वय २६) ही तरुणी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी या दोन्ही घटनांची सांगड घालत तो मृतदेह शिवानीचाच असावा, असा प्राथमिक अंदाज बांधला. या संशयावरून पोलिसांनी शिवानीचे वडील बापूराम कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांना ताब्यात घेतले. जळगाव जामोद न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या दोघांनीही न्यायालयासमोर शिवानीच्या हत्येची कबुली दिली होती.
…आणि ती जिवंत परतली!
हे संपूर्ण प्रकरण तेव्हा उलटून गेले, जेव्हा गत २८ मे रोजी शिवानी स्वतः खगनार पोलीस ठाण्यात हजर झाली आणि आपण जिवंत असल्याचे सांगितले. ती सुखरूप परत आल्याचे पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला.
खोट्या कबुलीमागचे धक्कादायक कारण
शिवानी जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, “वडील आणि भावाने खुनाची खोटी कबुली का दिली?” असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पोलीस तपासात याचे कारण आता समोर आले आहे.
शिवानी कोणालाही न सांगता घरातून पळून गेली होती. या गोष्टीचा तीव्र राग बापूराम आणि अजय यांच्या मनात खदखदत होता. दरम्यान, मृतदेह सापडल्याच्या प्रकरणात जेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, तेव्हा प्रचंड संतापाच्या भरात त्यांनी त्या अज्ञात मुलीच्या हत्येची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि पोलिसांची दिशाभूल केली.
सुटकेनंतर त्यांनी स्पष्ट केले की, पोलिसांचा कोणताही दबाव किंवा आमिष नव्हते, तर केवळ रागाच्या भरात त्यांनी हे पाऊल उचलले होते.
शिवानी जिवंत परत आल्यानंतर पोलिसांनी बाप-लेकाची बुलढाणा कारागृहातून सुटका केली आहे. मात्र, या सर्व प्रकारामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. राजुरा धरण परिसरात सापडलेला तो अर्धवट जळालेला मृतदेह नक्की कोणाचा होता? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवणे आणि त्या खऱ्या खुनाचा छडा लावणे, हे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.









