पुण्यात खळबळ! जनगणना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला १०-१२ जणांकडून बेदम मारहाण; आयुक्तांचे पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश

---Advertisement---

 

पुणे:
देशासह राज्यात सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामादरम्यान पुण्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यात जनगणनेचे (सर्वेक्षण) काम करणाऱ्या एका महिला प्रगणक (कर्मचारी) अधिकाऱ्याला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. या गंभीर घटनेची दखल घेत पुणे महानगरपालिका आयुक्तांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.


‘घर पाडले जाईल’ या भीतीने नागरिकांचा गैरसमज आणि हुज्जत
​सध्या शिक्षकांसह विविध सरकारी कार्यालयांतील कर्मचारी प्रगणक म्हणून घरोघरी जाऊन जनगणनेची माहिती गोळा करत आहेत. मात्र, हे कर्मचारी नक्की कोणते काम करत आहेत, याची स्पष्ट कल्पना नसल्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
​महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले की,
​”विशेषतः झोपडपट्टी भागात ‘पात्र-अपात्रतेचे किंवा घर पाडण्याचे सर्वेक्षण’ करण्यासाठी हे कर्मचारी आले आहेत, असा नागरिकांचा मोठा गैरसमज होत आहे. आपली माहिती पालिकेकडे गेल्यास घर पाडले जाईल किंवा हक्क जाईल, या भीतीने रहिवासी संपूर्ण माहिती देत नाहीत आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. यातूनच मारहाणीचे प्रकार घडत आहेत.”
​या पार्श्वभूमीवर संवेदनशील आणि झोपडपट्टी भागात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना सोबत पाठवण्याचा आणि पोलिसांची गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे. तसेच स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

​दुसरीकडे, जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना पुण्याच्या मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथे दीपाली तांबे या महिला शिक्षिकेचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटनाही नुकतीच घडली आहे. जनगणनेच्या अतिरिक्‍त कामाच्या ताणामुळे झालेला हा राज्यातील चौथा मृत्यू आहे.
​यापूर्वी कोल्हापूरचे भगवान पाटील आणि सांगोला येथील राजाराम ढोले यांचा हृदयविकाराच्या झटक्याने, तर लातूरचे सुंदरम वांगसकर यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. या लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे शिक्षक संघटनांनी सरकारवर तीव्र शब्दांत टिकेची झोड उठवली असून शिक्षकांचे कुटुंब उघड्यावर पडल्याची भावना व्यक्त केली आहे.


​कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या शिक्षकांच्या कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जनगणना करताना प्रगणकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळावे आणि कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर तात्काळ सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---