होर्मूझ समुद्रधुनीवरून अमेरिका-इराण तणाव; इस्लामाबादमध्ये शांतीवार्ता सुरू

---Advertisement---

 

इस्लामाबाद : होर्मूझ समुद्रधुनीवरील नियंत्रणाच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून, हा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे शांतीवार्तेला सुरुवात झाली आहे.
इराणने होर्मूझ समुद्रधुनीवर आपले नियंत्रण असल्याचे सांगत, तेथून जाणाऱ्या तेल व व्यापारी जहाजांकडून टोल वसुली सुरू केल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे. युद्धविरामाच्या अटींमध्ये या समुद्रधुनीतून जहाजांना मोकळा मार्ग देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, इराणच्या या भूमिकेमुळे अमेरिका नाराज असून, टोल आकारणी थांबवण्याचा इशारा दिला आहे.


इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी मात्र होर्मूझवरील नियंत्रण हा इराणचा कायदेशीर हक्क असल्याचे स्पष्ट करत, यासाठी देशाने मोठे बलिदान दिले असल्याचे सांगितले. “आम्हाला युद्ध नको आहे, मात्र आमचे हक्क सोडणार नाही,” असा संदेश त्यांनी राज्यवाहिनीवर दिला.


दरम्यान, युद्धविरामात लेबनॉनचाही सहभाग असल्याने इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले थांबवावेत, अशी मागणी इराणने केली आहे. अन्यथा युद्धविराम मोडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. लेबनॉनच्या नागरी संरक्षण विभागानुसार, अलीकडील हवाई हल्ल्यांमध्ये २५४ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे इस्रायल-इराण संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.


इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांनी पाकिस्तानशी संपर्क साधत परिस्थितीवर चर्चा केली आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या समझोत्यात लेबनॉनचा समावेश नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतरही परिस्थिती चिघळलेलीच आहे.


या पार्श्वभूमीवर इस्लामाबाद येथे सुरू झालेल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स, तर इराणकडून परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची आणि संसदाध्यक्ष मोहम्मद बघेर घालीबफ सहभागी झाले आहेत. या चर्चेतून होर्मूझवरील तणाव लवकर निवळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, या घडामोडींमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून, पुन्हा एकदा इंधन टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---