---Advertisement---
तेहरान : इराण आणि अमेरिकेतील तणाव आणि त्यानंतर जाहीर करण्यात आलेला संघर्षविराम नाजूक वळणावर आहे. अणुकार्यक्रमांतर्गत युरेनियम संवर्धनाचा अधिकार कायम ठेवणे हा अमेरिकेसोबत होणाऱ्या कोणत्याही करारासाठी प्रमुख अट असेल, असे इराणच्या अणुसंस्थेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेले हे भीषण युद्ध थांबवण्यासाठी संघर्षविरामाची घोषणा करण्यात आली. मात्र, सद्यपरिस्थिती पाहता हा संघर्षविराम तकलादू ठरणार असल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे, पाकिस्तानमधील इराणचे राजदूत अमिरी मुगाद्दम यांनी इस्लामाबाद येथे होणाऱ्या अमेरिका-इराण संघर्षविराम चर्चेसाठी प्रतिनिधीमंडळ आल्याची समाज माध्यमावरील पोस्ट हटवली. ही पोस्ट हटवल्यानंतर चर्चेबाबत संशय वाढला आहे तसेच पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
यापूर्वी घोषणेनंतर काही तासांतच इस्रायलने संघर्षविरामाच्या लेबनॉनची राजधानी बैरूत येथे जोरदार हल्ले केले. बुधवारी हे युद्ध खूपच हिंसक झाले. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात २५० पेक्षा जास्त ठार झाले. संघर्षविरामात लेबनॉनचाही समावेश होता, असा दावा इराणने केला आहे. मात्र, अमेरिका आणि इस्रायल यास नकार देत आहेत.
जगातील २० टक्के तेल व्यपारासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या होर्मुझवर इराणचे नियंत्रण कायम आहे. लेबनॉनवर झालेल्या हल्ल्यांनंतर इराणने ही सामुद्रीधुनी पुन्हा बंद केली आहे. लेबनॉनवरील हल्ले थांबले नाही, तर होर्मुझ सामुद्रधुनी पूर्ण बंद होईल, असे संकेत इराणी माध्यमांनी दिले आहेत. दुसरीकडे, ट्रम्प पुन्हा धमकी देत आहेत. इराणने कराराच्या अटींचे पालन केले नाही, तर या देशाला अत्यंत घातक हल्ल्यांना तोंड द्यावे लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
सौदी अरब-इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांत चर्चा
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेपूर्वी सौदी अरबचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैजल बिन फरहान आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात दूरध्वनीवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. पश्चिम आशियातील वाढता तणाव कमी करण्यासाठी तसेच प्रदेशात स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या विविध मार्गांवर चर्चा केली. लेबनॉन आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इस्रायली हल्ल्यांमुळे संघर्षविरामाला धोका निर्माण झाला असताना, इराणने सौदी अरबसोबत साधलेला संपर्क दर्शवतो की, वाटाघाटींपूर्वी ते प्रादेशिक शक्तींसोबत समन्वय प्रस्थापित करण्याचा आणि दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.









