---Advertisement---
प्रवाशांना अधिक चांगल्या आणि सुलभ सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेने जळगाव रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला असून, लवकरच स्थानकाचे रुपडे बदलणार आहे. स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.
यामध्ये फलाट क्रमांक 2 आणि 6 वर सरकते जिने (एस्कलेटर) बसविणे, चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ विकसित करणे तसेच अतिरिक्त तिकीट खिडकी उभारण्याचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून गर्दीही कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडीया यांनी भुसावळ विभागाकडे जळगाव स्थानकातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे. प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि व्यवस्थापनासंदर्भातील अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनधिकृत स्टॉल, हातगाड्या आणि इतर व्यवसायांमुळे गर्दी वाढून वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
तसेच, पाटलीपुत्र एक्सप्रेसला जळगाव येथे अधिकृत थांबा देण्याची मागणीही पुढे आली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता हा थांबा आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
जळगाव रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे केंद्र असून, येथे आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.









