---Advertisement---
डेहराडून : केदारनाथ धाम हे हिंदु बांधवांसाठी सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून, ते तब्बल ३,५८३ मीटर उंचीवर आहे. येथे चारधाम यात्रेला असंख्य भाविक दाखल होत असतात. या पार्शभूमीवर सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाची चारधाम यात्रा १९ एप्रिलपासून सुरू होत असून, केदारनाथ मंदिराचे दरवाजे २२ एप्रिल रोजी उघडणार आहेत. यात्रेच्या तयारीदरम्यान हेलिकॉप्टर सेवेची नोंदणीही सुरू करण्यात आली आहे.
हेलिकॉप्टरने प्रवास करू इच्छिणाऱ्या भाविकांनी केवळ आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच तिकिटे बुक करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही सेवा २२ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उपलब्ध असेल. मात्र, त्याआधी उत्तराखंड पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढील बुकिंग करता येणार नाही.
या बुकिंग प्रक्रियेत एका ओळखपत्रावर जास्तीत जास्त सहा तिकिटे घेण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरल्यानंतर प्रवासासाठी वेळ आणि जागा निश्चित करता येणार आहे. केदारनाथसाठी हेलिकॉप्टर सेवा गुप्तकाशी, फाटा आणि सिरसी या तीन ठिकाणांहून सुरू होते. गुप्तकाशी मार्गे येण्या-जाण्याचा खर्च सुमारे बारा हजार सातशे बासष्ट रुपये आहे, तर फाटा मार्गे सुमारे दहा हजार एकशे चौसष्ट रुपये आणि सिरसी मार्गे सुमारे सहा हजार तीनशे नव्वद रुपये खर्च येतो.
दरम्यान, प्रशासनाने यात्रेकरूंना फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. बनावट संकेतस्थळे, संदेश सेवा किंवा सामाजिक माध्यमांवर दिल्या जाणाऱ्या ऑफरपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडल्या असल्यामुळे भाविकांनी केवळ अधिकृत माध्यमांचाच वापर करून आरक्षण करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.









