---Advertisement---
जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी (१० एप्रिल) साने गुरुजी ग्रंथालयाला सदिच्छा भेट देत तेथील कामकाज आणि सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी नव्या बांधकामाबाबत महापौरांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याप्रकरणी त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदाराला चांगलेच सुनावले.
वाचकांशी संवाद; पुस्तकांची वाढती मागणी
या पाहणीदरम्यान शिवसेनेचे गटनेते तथा स्थानिक नगरसेवक विष्णू भंगाळे उपस्थित होते. ग्रंथपाल मणिलाल डाबोरे यांनी ग्रंथालयाची सद्यस्थिती महापौरांना सांगितली. सध्या वाचकांकडून मराठी साहित्याबरोबरच स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांना मोठी मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रंथालयात हिंदी व इंग्रजी पुस्तके उपलब्ध असली तरी विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येनुसार स्पर्धा परीक्षांच्या अधिक पुस्तकांची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावर महापौरांनी तातडीने आवश्यक पुस्तकांची यादी सादर करण्याच्या सूचना देत ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप
ग्रंथालयात सध्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर नवीन अभ्यासिका, ई-लायब्ररी आणि विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करताना महापौरांनी ठेकेदाराकडे कामाच्या अंदाजपत्रकाबाबत व प्रगतीबाबत माहिती मागितली. मात्र, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि ठेकेदाराला फैलावर घेतले.
विशेष बैठकीचे निर्देश
ग्रंथालयातील प्रलंबित प्रश्न व बांधकामाचा दर्जा यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी महापौरांनी लवकरच महापालिका आयुक्तांसोबत विशेष बैठक घेण्याचे निर्देश दिले. या बैठकीत वास्तूविशारद आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला जाणार आहे.
पाहणीदरम्यान महापौरांनी ग्रंथालयात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे अभ्यासासाठी येत आहेत, ही समाधानाची बाब आहे. त्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्या म्हणाल्या.
या भेटीमुळे ग्रंथालयाच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









