---Advertisement---
(पंढरपूर प्रतिनिधी : अभिजीत अवताडे) पंढरपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना घडली असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मतदारसंघात नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीला अद्याप साडेतीन वर्षांचा कालावधी शिल्लक असला, तरी शिंदेंनी आतापासूनच ‘बेरजेचे राजकारण’ सुरू केल्याचे या घडामोडीतून स्पष्ट होत आहे. पंढरपूरात भालके आणि सावंत यांसारख्या प्रभावी नेत्यांना एकत्र आणत त्यांनी थेट २०२९ विधानसभा लक्ष्य ठेवले आहे.
कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी “ऑपरेशन टायगर”च्या चर्चांना पूर्णविराम देत, “आता कोणत्याही ऑपरेशनची गरज नाही. जनसेवेच्या अजेंड्यामुळे लोक स्वतःहून माझ्याकडे येतात,” तसेच, भविष्यात मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ होणार असल्याचे संकेत देत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.दरम्यान, भगीरथ भालके यांनीही आक्रमक भूमिका घेत, “२०२९ मध्ये पंढरपूरचा आमदार शिंदेंच्या विचाराचा असेल,” अशी थेट संकेत दिले . मागील निवडणुकीत भालके यांना सुमारे १ लाख १५ हजार मते मिळाली होती, तर अनिल सावंत यांनीही लक्षणीय मतसंख्या मिळवत तिसरे स्थान पटकावले होते. या दोघांची मतांची बेरीज आणि शिवसेनेची पारंपारिक मतं लक्षात घेतली, तर विद्यमान भाजप आमदारांसाठी ही लढत कठीण ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपकडे असला, तरी महायुतीत जागा असतानाही शिंदे गटाने स्वतंत्र ताकद उभारण्यास सुरुवात केल्याचे या पक्षप्रवेशातून दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा थेट सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.यावेळी शिंदे यांनी “जनतेचा पैसा हा जनतेचाच असून त्यावर कोणाचाही मक्तेदारी नाही,” असे सांगत अप्रत्यक्ष मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला. तर भालके यांनीही “निधी देणारा नेता इथेच बसलाय” असे म्हणत गोरे यांना खुले आव्हान दिले.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड असल्याचे मानले जाते. जिल्ह्यातील अनेक नेत्यांचा त्यांच्यावर ठाम विश्वास असून त्यांना ‘चाणक्य’ म्हणूनही संबोधले जाते. अशा परिस्थितीत पंढरपूरच्या या बदलत्या राजकीय समीकरणांकडे फडणवीस कोणत्या पद्धतीने लक्ष देतात, कोणती रणनीती आखतात आणि पुढे कोणते राजकीय डाव खेळतात, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
एकूणच, पंढरपूरात झालेला हा पक्षप्रवेश केवळ राजकीय घटना नसून आगामी विधानसभा रणांगणाची नांदी मानली जात आहे. शिंदेंची रणनीती, भालके-सावंत यांची ताकद आणि त्यावर फडणवीसांची संभाव्य चाल या सर्व घटकांमुळे हा राजकीय ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.









