अमळनेरात रेती डंपरने दिलेल्या धडकेत जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

---Advertisement---

 

अमळनेर शहरात काल रात्री घडलेल्या रेती डंपर अपघाताने आणखी एक जीव घेतला आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत व्यक्ती शेख अब्दुल (वय ६५, रा. जोशीपुरा, अमळनेर) असे असून ते बसस्थानकाजवळ चहाचे छोटे दुकान चालवत होते. त्यांच्या मागे दोन मुली आणि दोन मुलांचा परिवार आहे. काल रात्री मुख्य चौकात एका रेती डंपरने (क्रमांक MH 41 8464, नंबर पुसलेला) त्यांना जोरात धडक दिली होती. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र प्रकृती गंभीर असल्याने आज त्यांचा मृत्यू झाला.

ही दुर्घटना प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय आणि बळीराजा स्मारकाजवळील गर्दीच्या चौकात घडली. इतक्या महत्त्वाच्या प्रशासकीय भागात अपघात होऊनही जड वाहनांवर नियंत्रण नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, शहरात अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी सिंधी कॉलनी परिसरात क्रेनच्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्याआधीही रेती डंपरच्या धडकेत घनश्याम पाटील या तरुणाचा बळी गेला होता. या घटनांनंतरही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

शहरातून मोठ्या प्रमाणावर रेती डंपर वेगाने धावत असल्याचे दिसत आहे. अनेक वाहनांचे क्रमांक स्पष्ट नसल्याने अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---