---Advertisement---
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध क्षेत्रांशी संबंधित ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यात मुंबईत ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नावाने संगीत अकॅडमी स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.
आशा भोसले यांच्या निधनानंतर राज्य सरकारने त्यांच्या नावाने ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’ उभारण्याचा निर्णय घेतला असून, वांद्रे-अंधेरी परिसरात यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा निर्णय त्यांच्या कार्याला अभिवादन मानला जात आहे.
मंत्रिमंडळाचे इतर महत्त्वाचे निर्णय:
वैद्यकीय शिक्षण विभाग : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अधिनियमात सुधारणा; सदस्यांची नियुक्ती निवडणुकीऐवजी शासनाकडून नामनिर्देशन पद्धतीने होणार.
भरती प्रक्रिया सुधारणा : एमपीएससी अंतर्गत सेवांची संख्या ५३ वरून १५३ पर्यंत वाढविणार; संयुक्त परीक्षा योजनेत नवीन सेवांचा समावेश.
नगरविकास : कुळगाव-बदलापूर येथे स्टेडियम आरक्षणात बदल करून वीज उपकेंद्रासाठी ४ एकर जमीन Tata Power ला देण्याचा निर्णय.
कौशल्य विकास : मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठ स्थापनेस मंजुरी; कुशल मनुष्यबळ निर्मितीस चालना.
मत्स्यव्यवसाय : सागरी जिल्ह्यांतील मच्छिमारांसाठी ६१.२४ कोटींच्या निधीतून मूलभूत सुविधा उभारणार.
आरोग्य क्षेत्र : जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून ३,७०८ कोटींचे वित्तीय सहाय्य; आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होणार.
नियोजन विभाग : NITI Aayog च्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे, परभणी या ६ जिल्ह्यांचा समावेश.
या सर्व निर्णयांमुळे राज्यातील पायाभूत सुविधा, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी गती येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.









