हृदयद्रावक घटना ! पहूरमध्ये चक्कर येऊन पडल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

---Advertisement---

 

पहूर येथे एका १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. हितेश अरुण पवार हा आपल्या मित्रांसोबत पहूर कसबे येथील हनुमान मंदिराच्या पायरीवर बसला असताना त्याला अचानक चक्कर आली. तो तोल जाऊन खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर मित्रांनी आणि स्थानिकांनी तातडीने त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारांनंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

हितेश हा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी होता. शालेय जीवनातच त्याने पियानो वादनाची आवड जोपासली होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत तो पियानोवर राष्ट्रगीत सादर करत असे. सध्या तो अजिंठा येथील बाबुरावजी काळे महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. शिक्षणाबरोबरच तो वडिलांच्या ‘मोहित बँड’मध्येही सहभाग घेत होता.

त्याच्या अंत्यसंस्कारावेळी पारंपरिक पद्धतीनुसार काही धार्मिक विधी पार पडले. अंत्यसंस्कारावेळी सुपारीसोबत लग्न लावण्याची पारंपरिक प्रथा पार पडली. यावेळी पुरोहितांनी उच्चारलेल्या करुण मंगलाष्टकांनी वातावरण अधिकच भावुक झाले आणि उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सकाळी नऊ वाजता वैकुंठधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नेहमी हसतमुख आणि मित्रपरिवारात रमणारा हितेश अचानक निघून गेल्याने पहूर आणि आसपासच्या गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण आणि आजोबा असा मोठा परिवार आहे.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांत पहूरमध्ये सलग मृत्यू झाल्याच्या घटनांमुळे गावावर दु:खाचे सावट अधिक गडद झाले आहे. शुक्रवारी विठ्ठल मंदिराचे चोपदार हरिभक्त परायण भागवत महाराज बाविस्कर यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, तर शनिवारी शिवसेनेचे कार्यकर्ते आनंदा धनगर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. रविवारी हितेश पवारच्या अंत्यसंस्कारासाठीही मोठी गर्दी झाली होती. सलग तिसऱ्या दिवशी स्मशानभूमीत चिता पेटल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---