---Advertisement---
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकाला १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. या घटनेमुळे जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराच्या मुलांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाची चौकशी पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे (वय ४०) यांच्याकडे होती. संबंधित प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी त्यांनी सुरुवातीला २ लाख रुपयांची लाच मागितली होती.
लाचेच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने १३ एप्रिल २०२६ रोजी एसीबी, जळगाव कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने गोपनीय पडताळणी केली असता, अहिरे यांनी पंचांसमक्ष १ लाख रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शवली.
यानंतर एसीबीच्या पथकाने शनिपेठ पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच पथकाने तत्काळ कारवाई करत अहिरे यांना रंगेहात अटक केली.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्रातील एसीबीचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, स्मिता नवघरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.









