---Advertisement---
राज्यात उष्णतेची तीव्र लाट वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले आहे.
महाजन यांनी सांगितले की, अतिवृष्टी, वादळ, चक्रीवादळ किंवा भूकंप यांसारख्या आपत्तीप्रमाणेच उष्णतेचे संकटही गंभीर असून शासन त्यावर लक्ष ठेवून आहे. सध्या देशातील तीन-चार राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट असून महाराष्ट्राचाही समावेश अति उष्ण राज्यांमध्ये होत आहे.
नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या काळात शक्यतो बाहेर पडणे टाळावे. विशेषतः लहान मुलांना घराबाहेर पाठवू नये, तसेच मजूर आणि कामगारांनी तीव्र उन्हाच्या वेळेत काम करणे टाळावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून याबाबत सूचना जारी करण्यात आल्या असून उष्णतेची लाट वाढत असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.









