---Advertisement---
राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका गुन्ह्यातील कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
या सुनावणीदरम्यान काही काळ तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याने प्रक्रिया थांबली होती. मात्र, नंतर सुनावणी पुन्हा सुरू झाली. सरकारी पक्षाचे वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी आरोपीच्या गुन्ह्याचे गांभीर्य न्यायालयासमोर मांडले. आरोपी स्वतःला देवाचा अवतार असल्याचे सांगत महिलांना जाळ्यात ओढत होता. त्यांना तांब्याच्या भांड्यातील पाणी व पेढा देऊन त्यात गुंगीचे औषध मिसळले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणातील गुंगीच्या औषधांचा प्रकार आणि भोंदूगिरीसाठी वापरलेल्या साधनांचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. यावर आरोपीच्या वकिलांनी विरोध दर्शवत, यापूर्वीही अशाच प्रकारचा युक्तिवाद झाल्याचे सांगून कोठडीची गरज नसल्याचे नमूद केले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तिसऱ्या गुन्ह्यातील कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
दरम्यान, आरोपीवर आतापर्यंत १२ गुन्हे दाखल असून, अनेक महिलांची फसवणूक आणि अत्याचार केल्याचे समोर आले आहे. विधवा तसेच विवाहित महिलांनाही जाळ्यात ओढल्याचा तपासात उलगडा झाला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून अधिक माहिती समोर आणण्याचा एसआयटीचा प्रयत्न सुरू आहे.









