---Advertisement---
शहरालगतच्या महामार्गांवरील अतिक्रमणांमुळे वाढलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महानगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकीत याबाबत ठोस नियोजन करण्यात आले.
या बैठकीला स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, उपायुक्त पंकज गोसावी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, नगरसेवक अरविंद देशमुख, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, ‘NHAI’चे राहुल पाटील तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर उपस्थित होते.
महामार्गावरील नेरी नाका ते अजिंठा चौक, अजिंठा चौक ते खेडी, अजिंठा चौक ते कुसुंबा आणि खेडी ते खोटे नगर या भागांतील अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः अजिंठा चौकातील अनेक वर्षांपासून सुरू असलेला भंगार बाजार नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून, पुढील तीन दिवसांत येथे मोठी कारवाई केली जाणार आहे. या वेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक शाखेकडूनही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. शहरात ९५ रिक्षा स्टॉप असतानाही अनेक चालक रस्त्यातच वाहने उभी करत असल्याने कोंडी वाढते. अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर पुढील आठ दिवसांत कारवाई केली जाणार असून, त्याआधी त्यांची बैठक घेण्यात येणार आहे.
तसेच बाजारपेठांमधील अस्ताव्यस्त पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी टोईंग कारवाईचेही नियोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण मोहिमेचा पुढील आढावा घेण्यासाठी लवकरच पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.









