१०० रुपयांची लाच भोवली! महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; टेबलाखालून ४१,२५० जप्त

---Advertisement---

 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेत लाभ देताना लाच मागणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. आसमा परवीन शेख इरफान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, या मंडळातील कर्मचाऱ्याविरुद्ध लाचखोरीची राज्यातील पहिलीच कारवाई असल्याची माहिती एसीबीने दिली.
एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराने ९ एप्रिल २०२६ रोजी गृह उपयोगी संचासाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर १५ एप्रिल रोजी चिंचोली (ता. जि. जळगाव) येथील वितरण केंद्रावर संच घेण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले. केंद्रावर गेल्यानंतर तक्रारदाराला एका कर्मचाऱ्यामार्फत आरोपीकडे पाठवण्यात आले.


यावेळी आरोपीने “संच मिळवण्यासाठी केवायसी करावी लागेल” असे सांगत १०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने तत्काळ एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सायंकाळी सापळा रचून पंचांसमक्ष आरोपीला १०० रुपये स्वीकारताना रंगेहात अटक केली.
कारवाईदरम्यान आरोपीच्या टेबलाखाली ठेवलेल्या पेटीतून ५००, २००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटांमध्ये एकूण ४१,२५० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात ही रक्कम केवायसीच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून लाच म्हणून गोळा केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


या सापळा कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे (एसीबी, नंदुरबार) यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. पथकात उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोहेकॉ बाळू मराठे, पो.कॉ. राकेश दुसने व प्रदीप पोल यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नकशे करत आहेत.
दरम्यान, एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय योजनांचा लाभ मिळविताना कोणीही लाच मागितल्यास त्वरित तक्रार करावी. यासाठी टोल-फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी ०२५७-२२३५४७७ तसेच ई-मेलद्वारे संपर्क साधता येणार आहे.


या कारवाईमुळे बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमधील भ्रष्टाचारावर आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---