---Advertisement---
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी महाबळ परिसरातील दिव्यांग पुनर्वसन केंद्राला गुरुवारी अचानक भेट देत केंद्राच्या कामकाजाची सखोल पाहणी केली.
नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी केंद्रातील विविध विभागांना भेट देऊन तेथील सुविधा, उपलब्ध सेवा आणि लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या उपचार व पुनर्वसन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून केंद्राच्या एकूण कामकाजाचा आढावा घेत, सेवांची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढविण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
करिश्मा नायर यांनी दिव्यांग लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि गरजा जाणून घेतल्या. दिव्यांगांना सुलभ, दर्जेदार आणि वेळेत सेवा मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद करत प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश दिले.
तसेच पुनर्वसन केंद्रातील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. केंद्राच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यावर भर देत, शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या भेटीदरम्यान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









