“संशोधन, जिज्ञासा आणि निरंतर शिकण्याची वृत्ती आत्मसात करा” – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

---Advertisement---

 

नागपूर – वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावाबरोबरच आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्ती जपणे अत्यावश्यक असून, जिज्ञासा, संशोधन आणि सतत ज्ञान संपादन करण्याची सवय आत्मसात करा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
नागपूर येथील एम्सच्या द्वितीय दीक्षान्त समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रपती म्हणाल्या की, वैद्यकीय क्षेत्र हा केवळ व्यवसाय नसून मानवतेची सेवा करण्याचा एक संवेदनशील मार्ग आहे. डॉक्टर केवळ आजारांवर उपचार करत नाहीत, तर रुग्णांच्या मनात आशेचा किरण निर्माण करतात. त्यामुळे करुणा, प्रामाणिकपणा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन यांना तितकेच महत्त्व आहे.


तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते मानवी मूल्यांची जागा घेऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना करुणेचा भाव जपण्याचा सल्ला दिला. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वास टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी संवेदनशीलता आणि सन्मान आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आरोग्य क्षेत्रात होत असलेल्या वेगवान बदलांचा उल्लेख करत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल हेल्थ सेवा आणि संशोधनाच्या माध्यमातून मोठी प्रगती होत असल्याचे सांगितले. या तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण-शहरी दरी कमी करून सर्वांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी करावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.


केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करताना आयुष्मान भारत योजना, डिजिटल हेल्थ मिशन, टीबी निर्मूलन आणि जनऔषधी केंद्रांसारख्या उपक्रमांमुळे आरोग्य सेवा अधिक सक्षम होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---