आपलेपणातून घडते तीच खरी सेवा : डॉ. मोहनजी भागवत, लता-आशा मंगेशकर मेडिकल फाऊंडेशन कोनशीला अनावरण प्रसंगी प्रतिपादन

---Advertisement---

 

पुणे : खरी सेवा ही आपलेपणातून घडते. आपलेपणा असला की मनुष्य आहे त्या परिस्थितीत सेवा करतो. मंगेशकर कुटुंब परंपरेने अशीच आपलेपणाने सेवा करीत आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. नांदोशी येथील लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कोनशीला अनावरण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मंजूषा नागपुरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फाऊंडेशनचे अध्यक्ष पंडित हृदयनाथ मंगेशकर, विश्वस्त उषा मंगेशकर, आनंद भोसले, आदिनाथ मंगेशकर, लता मंगेशकर फाऊंडेशनचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर उपस्थित होते.

सरसंघचालक म्हणाले की, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी अखंड स्वरसेवा केली. त्यांचे स्वर मानवी वेदना दूर करणारे आहेत. आजचा कोनशीला अनावरण कार्यक्रम नियोजित वेळी घेतला, ही दोन्ही गायिकांच्या कार्याला दिलेली श्रद्धांजली आहे. मंगेशकर कुटुंब आपलेपणातून रुग्णांची जी सेवा करीत आहे, अशी सेवा आपण सर्वांनी केली पाहिजे.

फडणवीस म्हणाले की, आशाताई त्यांचे आयुष्य उत्सवासारख्या जगल्या. मंगेशकर कुटुंब देशभक्तीने ओतप्रेत भरलेले आहे. लता आणि आशाताईंना सावरकरांविषयी विशेष आदर होता. या कुटुंबाने कधीही सेवेचा सौदा केला नाही, कायम सेवा केली. त्यामुळेच अशी सेवा
देणाऱ्या धर्मादाय संस्थांना इमारत करात सवलत देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येईल.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दुःखाची आणि वेदनांची जाणीव आशाताईंना होती. अनेक संकटांना सामोरे जाताना आशाताई कायम हसतमुख होत्या. त्यामुळेच या ठिकाणी संगीत थेरपी सेंटर देखील उभे करावे; कारण लता आणि आशाताईंच्या संगीतातून अनेक रुग्ण बरे होतील, यात शंका नाही. लतादीदी आणि आशाताई आज आपल्यात नसल्या, तरी हे रुग्णालय त्यांच्या आठवणी सदैव ताज्या ठेवेल. आशाताईंचे सुपूत्र आनंद भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.

४० एकरात उभारणार प्रकल्प

प्रास्ताविकात लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. धनंजय केळकर यांनी रुग्णालय प्रकल्पाची माहिती दिली. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ४० एकर क्षेत्रात हा रुग्णालय प्रकल्प उभारण्यात येत असून, तो देशातील मोठा रुग्णालय प्रकल्प असावा, असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---