---Advertisement---
शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांसह समोर आलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणानंतर शनिपेठ पोलीस ठाण्यावर पोलीस अधीक्षकांनी धडक कारवाई केली आहे. लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्या गेलेल्या पोलीस नाईक विनोद अहिरे याला सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शनिपेठ परिसरात दोन गटांतील हाणामारीच्या घटनांमुळे तणाव निर्माण झाला होता. त्यातच पोलीस नाईक विनोद अहिरे याला १ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले. या सलग घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने कारवाई करत विनोद अहिरे याला सेवेतून बडतर्फ केले. तसेच ठाण्याच्या प्रभारी अधिकारी कावेरी कमलाकर यांची बदली करून शनिपेठ पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. संवेदनशील प्रकरणांमध्ये होणारी दिरंगाई आणि शिस्तभंगाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली.
या धडक कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









