धरणगावात किर्केट स्पर्धेला आमंत्रण न दिल्याने क्रिकेट मैदानाची तोडफोड! ट्रॅक्टरने नांगर फिरवत मैदान उद्ध्वस्त, अंतिम सामना रद्द..!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला आहे. अंतिम सामना रंगात आला असतानाच एका व्यक्तीने थेट ट्रॅक्टर मैदानावर घुसवून नांगराच्या सहाय्याने संपूर्ण क्रिकेट मैदान उध्वस्त केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे अंतिम सामना तात्काळ रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली.

धरणगाव येथे आमदार चषक स्पर्धेचा अंतिम सामना मोठ्या उत्साहात सुरू होता. स्थानिक नागरिक, क्रीडाप्रेमी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामन्यातील थरार शिगेला पोहोचला असतानाच अचानक एक ट्रॅक्टर वेगाने मैदानात घुसला. ट्रॅक्टरला जोडलेल्या नांगराच्या साहाय्याने काही क्षणांतच खेळाचे संपूर्ण मैदान खराब करण्यात आले.


या प्रकारामुळे मैदानावरील पिच, सीमारेषा आणि संपूर्ण खेळपट्टीचे मोठे नुकसान झाले. खेळाडू आणि प्रेक्षक काही काळासाठी घाबरले आणि स्तब्ध झाले. सुरक्षेच्या कारणास्तव सामना तत्काळ थांबवण्यात आला आणि अखेरीस अंतिम सामना रद्द करण्यात आला.
घटना घडताच संबंधित ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकारामागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, स्पर्धेत आमंत्रण न मिळाल्याच्या रागातून एका स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्याने हे कृत्य केल्याचा संशय क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून क्रीडाविश्वात संतापाची लाट उसळली आहे. “खेळ हा एकतेचा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा असतो, अशा प्रकारांनी क्रीडासंस्कृतीला धक्का बसतो,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

---Advertisement---

 


दरम्यान, आयोजकांनी या घटनेची तात्काळ दखल घेत संबंधित प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे. नुकसानग्रस्त मैदानाची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

स्थानिक क्रीडाप्रेमी हरिहर पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अशा प्रकारामुळे खेळाडूंचा उत्साह खच्ची होतो. दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा भविष्यात अशा घटनांना आळा बसणार नाही.” सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू होण्याची शक्यता असून, पोलिस प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---