---Advertisement---
नाशिक येथील नामांकित आयटी कंपनीतील कथित छळ आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणात आता तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली असून, संशयितांना बाहेरील संघटनांकडून आर्थिक मदत मिळत होती का, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासाठी नाशिक पोलिसांनी इंटेलिजन्स ब्युरो (IB), राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि दहशतवाद विरोधी पथक (ATS) यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, २०२२ ते २०२६ या कालावधीत महिला कर्मचाऱ्यांचा छळ, विनयभंग, मानसिक अत्याचार तसेच धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे आरोप आहेत. लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याच्या तक्रारीनंतर तपासाला वेग आला.
तपासादरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यांनी कंपनीत भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, त्यांचे समुपदेशन केले. यानंतर काही महिला पुढे येऊन तक्रारी दिल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणात अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून, काहींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एका संशयिताचा शोध अद्याप सुरू आहे. तपास यंत्रणांनी रिसॉर्टमधील पुरावे तसेच ऑनलाइन व्यवहारांशी संबंधित माहिती जप्त केली आहे.
विशेष तपास पथक (SIT) या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, संशयितांच्या कारवायांमागे संघटित नेटवर्क किंवा बाहेरील आर्थिक मदतीचा संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या अनुषंगाने केंद्रीय यंत्रणांची मदत घेण्यात येत आहे.
पोलिसांकडून तपास सुरू असून, अधिकृत निष्कर्ष येईपर्यंत सर्व बाबींची छाननी केली जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









