---Advertisement---
साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचं एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगाव सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण झाली असून सोन्याच्या भावात सुमारे १,३०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ३,००० रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे.
सोन्या चांदीच्या ताज्या भावानुसार, गुरुवारी १ लाख ५३ हजार ३०० रुपये प्रति तोळा असलेला सोन्याचा भाव शुक्रवारी १ लाख ५२ हजार रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे, चांदीचा दरही घसरला असून गुरुवारी २ लाख ५६ हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी शुक्रवारी २ लाख ५३ हजार रुपयांवर पोहोचली आहे.
दरम्यान साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया मुहूर्ताच्या अगोदरच दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानली जात आहे. या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा असल्याने बाजारात खरेदीची उत्सुकता वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर युनायटेड स्टेट, इसराइल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे मागील काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू होते. मात्र, अमेरिकेकडून शस्त्रसंधीचे संकेत मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्याने दरात घसरण झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर ‘जळगाव सुवर्णनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. ग्राहकांसाठी ही संधी सोनं-चांदी खरेदीसाठी अनुकूल मानली जात आहे.









