---Advertisement---
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथसिंह मंगळवारपासून तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दौऱ्यात भारत आणि जर्मनीतील संरक्षण सहकार्य आणखी बळकट करण्यावर भर दिला जाईल. संरक्षण उद्योगाचा कृती आराखडा निश्चित करणे हा या दौऱ्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. भारत आणि जर्मनीत सहा अत्याधुनिक पाणबुड्यांच्या सौद्यावर मोहोर उमटण्याची शक्यता आहे.
भारत व जर्मनीतील संरक्षण उद्योगाच्या अंतर्गत भविष्यात दोन्ही देश शस्त्रास्त्रे आणि संरक्षण उपकरणांचा संयुक्त विकास आणि उत्पादन करू शकतील. राजनाथसिंह बर्लिन येथे जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस आणि अतर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा
करणार आहेत.
या बैठकांमध्ये संरक्षण उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढवणे, सौन्ही देशांच्या सैन्यातील संबंध बळकट करणे, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोनसारख्या नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात सोबत काम करण्यावर भर दिला जाईल. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांतील संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत संरक्षण उद्योगाशी संबंधित कृती आराखडा आणि संयुक्त राष्ट्रसंघाशी निगडित प्रशिक्षण आणि सहकार्य करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
भारत आणि जर्मनीत सहा अत्याधुनिक डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांचा सौदा लवकरच आकार घेऊ शकतो. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने राजनाथसिंह या दौऱ्यावर जाणार आहेत.
पाणबुडी प्रकल्प केंद्रस्थानी
भारत प्रोजेक्ट-७५ इंडियाच्या अंतर्गत सहा आधुनिक पाणबुड्यांच्या निर्मितीची जोरदार तयारी करीत आहे. जर्मन कंपनी थिसनकूप मरिन सिस्टिमसोबत हा सौदा अंतिम रूप घेत आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि या जर्मन कंपनीने जून २०२३ मध्ये एका करारावर स्वाक्षरी केली होती. राजनाथसिंह यांच्या या दौऱ्यात तंत्रज्ञान हस्तांतरण आणि औद्योगिक सहकार्यवर तपशीलवार चर्चा होईल.









