​नंदुरबार: सातपुड्याच्या दुर्गम भागात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; केवळ ‘बीए’ पास असून ५ वर्षांपासून रुग्णांवर उपचार

---Advertisement---

 

जिल्ह्यातील सातपुडा डोंगररांगांतील दुर्गम भागात एका बोगस डॉक्टरचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धडगाव तालुक्यातील वावी गावात कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना केवळ ‘बीए’ उत्तीर्ण असलेला तरुण गेल्या पाच वर्षांपासून डॉक्टर बनून रुग्णांवर उपचार करत असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील बीवस बाला नावाचा हा व्यक्ती वावी आणि परिसरातील पाड्यांवर बेकायदेशीरपणे दवाखाना चालवत होता. आरोग्य सेवांचा अभाव आणि स्थानिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याने आपला जम बसवला होता. या माध्यमातून आर्थिक फसवणूकही केल्याचा आरोप आहे.


दरम्यान, ‘आदिवासी जनजागृती टीम’चे राकेश पावरा व सहकाऱ्यांनी या दवाखान्यावर धाड टाकली असता धक्कादायक बाबी समोर आल्या. दवाखान्यात प्रेग्नन्सी किट्सचा साठा, वापरलेल्या सलाईन बाटल्यांचा ढीग तसेच विविध औषधे आढळून आली. वैद्यकीय ज्ञान नसतानाही तो गर्भवती महिलांवर उपचार करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कारवाईदरम्यान सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या या व्यक्तीने अखेर कॅमेऱ्यासमोर आपण केवळ ‘बीए’ उत्तीर्ण असल्याची कबुली दिली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


दरम्यान, प्रशासनाच्या नजरेआड पाच वर्षे हा बोगस दवाखाना कसा सुरू राहिला, असा सवाल उपस्थित होत असून आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---