---Advertisement---
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चर्चेचे आव्हान दिले आहे. “समोरासमोर बसून चर्चा करूया आणि ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होऊ द्या,” असा टोला त्यांनी लगावला.
खडसे यांनी म्हटले की, २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून या विषयावर कोणाचाही विरोध नाही. मात्र, सत्ताधारी भाजप महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून विरोधकांविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“भाजपची सत्ता असताना मोर्चे काढून काय साध्य होणार? मणिपूरमध्ये महिलांना न्याय मिळाला नाही, तसेच महाराष्ट्रातही महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
याशिवाय, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात महिलांना सर्वाधिक नेतृत्वाच्या संधी मिळाल्या. भाजपने किती महिलांना नेतृत्व दिले, याचा हिशेब द्यावा,” अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर खुल्या चर्चेसाठी मुख्यमंत्री पुढे येतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.









