---Advertisement---
भुसावळहुन पुणे आणि उत्तर भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. ‘पुणे-बनारस अमृत भारत एक्सप्रेस’ ही नवीन अत्याधुनिक ट्रेन येत्या २४ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर, आतापर्यंत विशेष गाडी म्हणून धावणारी पुणे-जबलपूर एक्सप्रेस आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली आहे.
पुण्याकडे जाणाऱ्या या दोन्ही गाड्या भुसावळ जंक्शनवरून धावणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. विशेषतः शिक्षण, नोकरी किंवा इतर कारणांसाठी पुण्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आता अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहेत.
‘अमृत भारत एक्सप्रेस’ ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ट्रेन असून, ती हडपसर टर्मिनलहून सुटणार आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या गाडीत स्लीपर आणि जनरल क्लाससह एकूण २२ डबे असतील.
या गाडीचे सविस्तर वेळापत्रक आणि बुकिंगची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी हडपसर, दौंड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, प्रयागराज आणि बनारस या प्रमुख स्थानकांवर थांबा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन पुणे-जबलपूर विशेष गाडीला कायमस्वरूपी मंजुरी देण्यात आली आहे. ही गाडी आता २०१९१/२०१९२ या क्रमांकाने नियमित पुणे-जबलपूर एक्सप्रेस म्हणून धावणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.








