---Advertisement---
उन्हाळी सुट्टीत बालकांच्या मनोरंजनासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जळगावात तीन दिवसीय ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २४, २५ आणि २६ एप्रिलदरम्यान शहरातील भाऊंचे उद्यान येथील एम्फी थिएटरमध्ये हा महोत्सव रंगणार आहे.
अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दररोज सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या महोत्सवात बालकांना मोठ्या पडद्यावर दर्जेदार, प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते होणार आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये गुंतलेल्या मुलांना अर्थपूर्ण मनोरंजन देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
चित्रपट हे शिक्षण आणि प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याने, बालकांसह पालकांनीही या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









