---Advertisement---
जळगाव महापालिकेच्या शाहू हॉस्पिटलमध्ये रुग्णांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारींची दखल घेत आमदार राजू मामा यांनी 23 एप्रिल रोजी अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान रुग्ण आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या तक्रारींमुळे त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
रुग्णालयात विनाकारण होणारा विलंब, अपुरी व्यवस्था आणि स्वच्छतेच्या बाबतीत दिसून आलेल्या त्रुटींवर आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “जनतेला उपचारांसाठी येताना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. प्रत्येक रुग्णाचे काम वेळेत झाले पाहिजे,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी प्रशासनाला सुनावले.
यावेळी त्यांनी रुग्णालयातील स्वच्छतेवर भर देत, परिसर नियमित स्वच्छ ठेवण्याचे तसेच आरोग्य सेवा अधिक कार्यक्षम करण्याचे आदेश दिले. रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना त्वरित आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
पाहणीदरम्यान काही रुग्णांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तक्रारी तत्काळ सोडवण्याच्या सूचना देत भविष्यात अशा त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या पाहणीमुळे रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली असून, आरोग्य सेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









