---Advertisement---
जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दिल्ली ते जळगाव हा प्रवास अवघ्या काही तासांत पूर्ण होणार असून अलायन्स एअरने नवी विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
जळगाव आणि दिल्लीदरम्यान हवाई प्रवासी वाहतूक अधिक मजबूत करण्यासाठी अलायन्स एअरकडून नवी विमान सेवा सुरू करण्यात येत आहे. येत्या २ मेपासून ही सेवा सुरू होणार असून जळगाव ते इंदूर ते दिल्ली असा हा मार्ग असणार आहे.
विमान सेवेचे वेळापत्रक काय ?
ही फ्लाइट आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी धावणार आहे. त्यामुळे जळगाव, इंदूर आणि दिल्लीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या नव्या विमानसेवेमुळे दिल्ली ते जळगाव हा प्रवास सुमारे ४ तासांत पूर्ण होणार आहे. आतापर्यंत रेल्वे किंवा रस्तामार्गे प्रवास करताना लागणारा मोठा वेळ आता वाचणार आहे.
या प्रवासाचे तिकीट दर सुमारे ३००० रुपयांपासून सुरू होत असून बुकिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे कमी वेळात आणि परवडणाऱ्या दरात प्रवास करण्याची संधी प्रवाशांना उपलब्ध झाली आहे.
जळगाव हून इंदूर-दिल्ली या विमानसेवेमुळे जळगाव जिल्ह्याचा देशातील प्रमुख शहरांशी संपर्क अधिक मजबूत होणार असून उद्योग, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.









