---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात मोकाट कुत्र्यांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. नारायण नगर परिसरात शाळेत जाणाऱ्या एका 9 वर्षीय विद्यार्थ्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तारकेश विशाल झोपे असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून, तो शाळेत जात असताना अचानक मोकाट कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
यावेळी स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत विद्यार्थ्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाला आहे.
जखमी अवस्थेत त्याला तात्काळ जळगावमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी पालक आणि स्थानिकांकडून केली जात आहे.









