---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात “मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना” प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समिती बैठकीत त्यांनी योजनेचा सखोल आढावा घेतला.
मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेच्या या बैठकीला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, ही योजना केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवणारी ठरली पाहिजे. रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समित्या स्थापन करून स्थानिक आमदारांच्या मार्गदर्शनाखाली कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. “ही योजना चारचाकी वाहनांसाठी नव्हे, तर शेतात जाणाऱ्या बळीराजाच्या पावलांचा विचार करणारी आहे,” असे सांगत त्यांनी योजनेचे महत्त्व अधोरेखित केले.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी ५० टक्के कामे ग्रामसडक योजनेतून आणि ५० टक्के कामे जिल्हा परिषदेमार्फत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात २५ किलोमीटरचे क्लस्टर तयार करून कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत जिल्ह्याच्या प्रति तास दरास (एल-1) जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली आहे.









