राज्यातील 85 हजार कृषी केंद्रांनी पुकारला बेमुदत संप; जळगाव जिल्ह्यातील साडेतीन हजार कृषी केंद्र सहभागी…!

---Advertisement---

 

महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्रातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मापदा संघटनेच्या वतीने आजपासून राज्यभरातील तब्बल 85 हजार कृषी केंद्रांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये जळगाव जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार कृषी केंद्रांचा सक्रिय सहभागी झाले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत हा आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. जोपर्यंत राज्य सरकार या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

कृषी केंद्र चालकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अनधिकृत HTBT बियाण्यांवर बंदी, खत कंपन्यांकडून केली जाणारी ‘लिंकिंग’ पद्धत थांबवणे, तसेच अवैध कीटकनाशके आणि खतांची एजंटमार्फत थेट विक्री रोखणे यांचा समावेश आहे. याशिवाय ‘साथी’ पोर्टलद्वारे बियाणे विक्री सक्तीचा निर्णयही रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मापदा संघटनेने आरोप केला आहे की, किरकोळ खत विक्रेत्यांवर लादण्यात आलेल्या जाचक नियमांमुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

शासनाने मागण्या मान्य न केल्यास कृषी केंद्रांना दिलेल्या ‘PoS’ मशीन शासनाकडे जमा करण्याचा इशाराही मापदा संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ यांनी दिला आहे. या संपामुळे राज्यातील शेतकऱ्यांना खत, बियाणे आणि कीटकनाशके मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून कृषी व्यवस्थेवर त्याचे परिणाम दिसून येऊ शकतात.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---