जळगावात उष्माघाताचा पहिला बळी, ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू? एसटी वर्कशॉपजवळ आढळला मृतदेह; कुटुंबीयांचा आक्रोश….!

---Advertisement---

 

जळगाव शहरात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे एक संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली आहे. उष्माघातामुळे 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत वृद्ध व्यक्तीचे नाव लोधू नामदेव पाटील (वय ६०, रा. तुकाराम वाडी, जळगाव) असे आहे. त्यांचा मृतदेह आज सकाळी अजिंठा चौफुली परिसरातील एसटी वर्कशॉपजवळ आढळून आला.

नातेवाईकांच्या माहितीनुसार, लोधू पाटील हे बोदवड तालुक्यातील हिंगणे येथे रविवारी सकाळी नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. दिवसभर कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर सायंकाळी सुमारे ७ वाजता त्यांनी अजिंठा चौफुली येथे उतरल्याचे आणि घरी जात असल्याचे मुलीला फोनवरून सांगितले होते.

मात्र, त्याच रात्री उशिरापर्यंत ते घरी पोहोचले नसल्याने नातेवाईकांनी रात्रभर त्यांचा परिसरात शोध घेतला. अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह एसटी वर्कशॉपजवळ आढळून आला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

नातेवाईकांच्या मते, रविवारी दिवसभर उन्हात राहिल्यामुळे उष्माघाताचा फटका बसून त्यांना चक्कर आली असावी आणि ते पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज मृत वृद्धाचे जावई भास्कर काळे यांनी व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्ह्यात तापमान तब्बल 45 अंशांपर्यंत पोहोचले असून उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. तथापि, लोधू पाटील यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट असून शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---