शहादा- २० हजारांची लाच घेताना कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात; जिल्हा परिषदेचे दोन कर्मचारीही ताब्यात…!

---Advertisement---

 

नंदुरबार – अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेअंतर्गत मंजूर कामाच्या प्रशासकीय मान्यता आदेशाची प्रत देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शहादा येथील कंत्राटी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील एका वरिष्ठ सहाय्यकासह सहायक लेखा अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यात संशयित म्हणून भूपेंद्र सरचंदराव राठोड (वय ३१),  कंत्राटी अभियंता, पंचायत समिती शहादा (ग्रामीण गृहनिर्माण), रमेश मन्साराम बागुल (वय ५६)  वरिष्ठ सहायक, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार. चंद्रेश जगजीवनदास शहा (वय ५१) सहायक लेखा अधिकारी, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार असे आहेत.

​तक्रारदाराने कुकावल (तालुका शहादा) येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला होता. या कामासाठी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी २ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता.

या कामाच्या प्रशासकीय मान्यतेच्या आदेशाची प्रत आरोपी रमेश बागुल यांनी स्वतःकडे न ठेवता ती परस्पर अभियंता भूपेंद्र राठोड यांच्याकडे दिली होती. तक्रारदार जेव्हा २७ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत चौकशीसाठी गेले, तेव्हा रमेश बागुल यांनी सदर प्रत मिळवण्यासाठी २०,००० रुपयांची मागणी केली आणि ही रक्कम भूपेंद्र राठोड याला देण्यास सांगितले. या मागणीला सहायक लेखा अधिकारी चंद्रेश शहा यांनीही प्रोत्साहन दिले.

​लाचेची मागणी झाल्याने तक्रारदाराने नंदुरबार एसीबीकडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी शहादा येथे सापळा रचण्यात आला. भूपेंद्र राठोड याने तक्रारदाराकडून २०,००० रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन शहादा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते, पोलीस निरीक्षक विकास लोंढे व त्यांच्या पथकाने यशस्वी केली. 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---