---Advertisement---
शहादा पोलिसांनी दोंडाईचा रोडवर नाकाबंदी करून एका आयशर कंटेनरमधून अवैध विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत दारू आणि वाहनासह एकूण ६० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दि. २ मे रोजी शहादा-दोंडाईचा रोडवर नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी संशयास्पद आयशर कंटेनर (क्र. आर जे २७ जीई ९५२७) पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने वाहन न थांबवता प्रकाशा रोडकडे पळवले. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून हे वाहन पकडले.
कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये चार्ली व्होडका, ग्रे वुल्फ व्होडका, रॉयल चॅलेंज आणि किंग्स गोल्ड व्हिस्कीचे एकूण ५३५ खोके आढळून आले. या दारूची किंमत ३० लाख १२ हजार रुपये आहे, तर ३० लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण ६० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी जीवनराम होशियारसिंग इटकांड, अजयकुमार जयवीर दहिया, रिंकीकुमार स्वारान (सर्व रा. हरियाणा), बोनी (रा. दिल्ली) आणि राजू मारवाडी (रा. सुरत) यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, डीवायएसपी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, सपोनि प्रवीण सोनवणे, पोलिस हवालदार दिपक चौधरी, शिपाई भगवान सावळे, कपिल मदिल आणि त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सपोनि प्रवीण सोनवणे करत आहेत.









