---Advertisement---
पुणे जिल्ह्यातील शांत आणि साधं असल्या नसरापूर गाव…. या गावावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण गाव अक्षरशः रडू लागलं. एका चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अमानवी अत्याचाराने आणि तिच्या निर्घृण हत्येने केवळ नसरापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेनंतर गावात संताप, वेदना आणि असहायता यांचं मिश्र वातावरण पाहायला मिळत आहे.
ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संतप्त ग्रामस्थ आणि पीडितेच्या कुटुंबीयांनी जोरदार निषेध नोंदवला. न्याय मिळावा, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी त्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. पुणे-बंगळुरू महामार्गावर ठिय्या आंदोलन करत वाहतूक रोखण्यात आली. एवढंच नाही, तर चिमुकलीचा मृतदेहही तब्बल 28 तास रुग्णवाहिकेत ठेवून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
शेवटी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर तब्बल 28 तासांनी त्या चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंत भावनिक वातावरणात हे अंत्यसंस्कार पार पडले. रात्री जवळपास 11 वाजून 50 मिनिटांनी वडिलांनी आपल्या लेकराच्या चितेला मुखाग्नी दिला… आणि त्या क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. संपूर्ण स्मशानभूमीत शोककळा पसरली होती. गावकऱ्यांपासून ते नातेवाईकांपर्यंत सर्वजण ढसाढसा रडत होते. त्या निरागस जीवाला अशा प्रकारे निरोप देताना वातावरण अक्षरशः सुन्न झालं होतं.
दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आता अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी आणि प्रकरण जलदगतीने चालवावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर भोर आणि राजगड तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद कडकडीत पाळावा, असे आवाहन स्थानिकांनी केले असून चिमुकलीच्या न्यायासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित मुलगी सुट्ट्यांमध्ये नसरापूर येथे आपल्या आजीकडे आली होती. खेळत असताना आरोपीने तिला फूस लावून गोठ्यात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता त्याने त्या चिमुकलीची हत्या केली. आपल्या कृत्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवण्याचा प्रयत्न केला. या क्रूरतेने सर्वांच्या अंगावर शहारे आले आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे ग्रामीण भागातील महिलां आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाच्या भूमिकेबद्दलही नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः बाल हक्क आयोगाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आज नसरापूरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र त्या चिमुकलीसाठी न्याय मागत आहे. तिच्या निरपराध जीवावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला जात आहे. मात्र, या सर्व संताप आणि आंदोलनांच्या दरम्यान एक प्रश्न कायम आहे… त्या चिमुकलीला न्याय कधी मिळणार?









