---Advertisement---
जळगावकरांसाठी महत्त्वाची मानली जाणारी जळगाव-दिल्ली विमानसेवा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे. ‘अलायन्स एअर’ कंपनीकडून सुरू होणारी ही सेवा तांत्रिक अडचणींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
२ मेपासून सुरू होणारी जळगाव-दिल्ली (इंदूर मार्गे) ही विमानसेवा पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. विमानाच्या तांत्रिक तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, सेवा सुरू होण्याच्या अगदी एक दिवस आधीच हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याआधीही ‘अलायन्स एअर’च्या सेवांबाबत अनिश्चितता आणि ऐनवेळी बदल झाल्याचे प्रकार समोर आले होते.
जळगाव-मुंबई विमानसेवेबाबतही यापूर्वी अशाच प्रकारे ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. वारंवार होणाऱ्या या बदलांमुळे विमान कंपनीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अलायन्स एअर कंपनीच्या म्हणण्यानुसार, आवश्यक दुरुस्ती आणि तपासणीनंतरच सेवा पुन्हा सुरू केली जाईल. मात्र, याबाबत निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.









