---Advertisement---
जळगाव: अंगारकी चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर आज पहाटे जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रसिद्ध क्षेत्र पद्मालय येथे श्री गणेशाचा अभिषेक आणि महापूजा करण्यात आली. पहाटे ४ वाजता संपन्न झालेल्या या विधिवत पूजेने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.
पद्मालय हे देशातील एकमेव असे स्थान आहे, जिथे डाव्या आणि उजव्या सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी विराजमान आहेत. या जागृत देवस्थानचे महत्त्व लक्षात घेता, अंगारकीनिमित्त येथे हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पद्मालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या निमंत्रणानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पहाटेची आरती आणि पूजा केली. यावेळी पुजारी गणेश वैद्य आणि केशवराव पुराणिक यांनी पौरोहित्य केले.
पूजा संपन्न झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराचा ऐतिहासिक वारसा आणि सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी देवस्थान ट्रस्टतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा शाल आणि गणरायाची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.
सध्याची कडक उष्णता लक्षात घेता, देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांसाठी सावलीसाठी मंडप, कुलर आणि थंड पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्याला तहसीलदार गोपाल पाटील, विश्वस्त आनंदराव पाटील, भिका पाटील, गोकुळ देशमुख, डॉ. पांडुरंग पिंगळे, राजेश तिवारी, अर्जुन पाटील, शिरीष बर्वे तसेच जैन इरिगेशनचे अनिल जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.









