---Advertisement---
राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांकडे गृह विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. नसरापूर घटनेचा संदर्भ देत, आरोपीवर आधीच दोन वेळा गुन्हे नोंद असतानाही पोलिसांनी त्याच्यावर नियंत्रण का ठेवले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे की, अनेक प्रकरणांमध्ये पीडित महिला तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जातात; मात्र पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे पीडित महिलांना न्याय मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
याशिवाय, काही प्रकरणांमध्ये तक्रार दाखल झाली तरी आरोपींना फरार होण्यासाठी वेळ दिला जातो आणि त्यानंतर आरोपी सापडत नसल्याचे सांगून प्रकरणांकडे दुर्लक्ष केले जाते, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे.
पोलिसांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने अनेक महिलांची तक्रार देण्याची हिंमतच होत नाही, असेही त्यांनी नमूद केले. एका महिलेवर एकदाच अत्याचार होतो; मात्र यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे तिला वारंवार अन्याय सहन करावा लागतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
या सर्व प्रकरणांवर राज्य सरकार आणि गृह विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.









