पावसाळ्यापूर्वी जळगाव मनपा ‘ॲक्शन मोड’वर; ‘नही’सह ‘पीडब्ल्यूडी’ला पाठवले कडक इशाऱ्याचे पत्र!

---Advertisement---

 

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जळगाव शहर महानगरपालिकेने शहरातील पाणी साचण्याच्या गंभीर ठिकाणांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीनंतर महापालिका प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) या दोन बड्या यंत्रणांना स्वतंत्र पत्रे पाठवून पावसाळ्यापूर्वी तात्काळ उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या पत्रांमुळे आता संबंधित विभागांची धावपळ उडणार असल्याचे चित्र आहे.


​’नही’ला थेट सवाल: अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीवरील पाण्याचा निचरा कधी?
​जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील अग्रवाल हॉस्पिटल (चौफुली) परिसरात दरवर्षी पावसाळ्यात अथांग पाणी साचते. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे स्थानिक व्यापारी, नागरिक आणि वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. या समस्येबाबत महापालिकेकडे तक्रारींचा ओघ सुरू होता.
​याची गंभीर दखल घेत मनपाच्या शहर अभियंत्यांनी थेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना लेखी पत्र बजावले आहे. सदर जागा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने, तेथील पाण्याचा जलद गतीने निचरा करण्यासाठी तुमच्या विभागाने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. महामार्गावरील या मुख्य चौकात पाणी साचून अपघात किंवा मोठी वाहतूक कोंडी झाल्यास त्याला संबंधित विभाग जबाबदार राहील, असा सुप्त इशाराही यातून देण्यात आला आहे.


​’पीडब्ल्यूडी’चा सुस्त कारभार; संयुक्त पाहणी झाली, मग काम का रखडले?

​दुसऱ्या पत्रात महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) संथ कारभारावर बोट ठेवले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील दुकानांपासून ते राम होंडा शोरूमकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आरसीसी गटर बांधण्याचे काम मंजूर आहे. यासाठीच्या वर्क ऑर्डर (कार्यादेश) देखील निघाल्या आहेत.
​काही दिवसांपूर्वीच ‘पीडब्ल्यूडी’चे अभियंता, कंत्राटदार आणि महापालिकेच्या अभियंत्यांनी जागेवर जाऊन संयुक्त पाहणी केली होती.

मात्र, पाहणी होऊनही प्रत्यक्ष कामाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. पाऊस तोंडावर असल्याने हे काम न झाल्यास संपूर्ण परिसरात जलमय संकट उभे ठाकणार असून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला ‘सर्वोच्च प्राधान्य’ देऊन ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, असे महापालिकेने पत्रात म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---