---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून, वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रचंड उकाडा आणि तीव्र उन्हामुळे जळगावकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच आता नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, उद्यापासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ मेपासून जळगाव जिल्ह्यात विविध भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून असह्य उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यात अद्याप अधिकृत मान्सून दाखल व्हायचा असला, तरी मान्सूनपूर्व हालचालींनी वेग घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही तालुक्यांमध्ये वातावरणात बदल जाणवत असून, ढगाळ हवामान आणि हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. आता पुढील काही दिवसांत या पावसाचा प्रभाव संपूर्ण जिल्ह्यात वाढण्याची शक्यता आहे.
दुपारनंतर बदलणार वातावरण; ताशी ५० किमी वेगाने वाहणार वारे
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस दुपारनंतर हवामानात मोठे बदल होणार आहेत. विशेषतः सायंकाळच्या सुमारास ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरी अनुभवायला मिळू शकतात.
दरम्यान, या पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होणार असली, तरी सकाळच्या वेळी हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी उकाडा कायम राहू शकतो. मात्र दुपारनंतर पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गही कामाला लागला आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून, कृषी विभागाने शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व सर्व कामे लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.









