जनगणना कामाचा आणखी एक बळी! पुण्यात महिला शिक्षिकेचा अपघाती मृत्यू; राज्यातील एकूण संख्या ४ वर, शिक्षक संघटनांचा संताप!

---Advertisement---

 

उन्हाळ्याच्या सुट्टीतही शिक्षकांना सक्तीच्या जनगणना कामाला लावल्यामुळे शिक्षकांमध्ये आधीच तीव्र नाराजी असताना, आता एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथे शासकीय जनगणनेच्या कामासाठी जात असताना एका शिक्षिकेचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. दीपाली तांबे असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. या घटनेमुळे राज्यातील जनगणना कामादरम्यान मृत्यू झालेल्या शिक्षकांची संख्या आता ४ झाली असून, शिक्षक संघटनांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे एका भरधाव डंपरने दीपाली तांबे यांच्या मोपेड दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, शिक्षिका दीपाली तांबे यांचा जागीच मृत्यू झाला.
​सध्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी असूनही शिक्षकांना भरउन्हात दारोदारी फिरून जनगणनेचे काम करावे लागत आहे. हक्काच्या सुट्टीच्या दिवशीही प्रशासनाकडून कामासाठी बोलावले जात असल्याने शिक्षकांवर मानसिक ताण होता. या पार्श्वभूमीवर, “शिक्षिका दीपाली तांबे यांच्या अपघाती मृत्यूला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल आता मावळ तालुक्यातील आणि राज्यातील शिक्षक विचारत आहेत. तसेच, महामार्गावरील भरधाव डंपर वाहतुकीवर तातडीने निर्बंध आणण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.


राज्यात आत्तापर्यंत ४ शिक्षकांचा मृत्यू
​जनगणनेच्या या सक्तीच्या कामामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण ४ शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे:
१. दीपाली तांबे (पुणे) – महामार्गावर डंपरच्या धडकेत अपघाती मृत्यू.
२. सुंदरम वांगसकर (लातूर) – जनगणनेच्या कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू.
३. भगवान पाटील (कोल्हापूर) – कामाच्या ताणामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.
४. राजाराम ढोले (सांगोला) – कामाच्या ताणामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.

​या लागोपाठ होणाऱ्या मृत्यूंमुळे मृत शिक्षकांचे कुटुंबीय पूर्णपणे उघड्यावर आले आहेत. या घटनेनंतर ‘कोल्हापूर खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाने’ तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनाला धारेवर धरले आहे. महासंघाचे अध्यक्ष राजेन्द्र कोरे यांनी आजच कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.


​शिक्षक संघटनांच्या प्रमुख मागण्या:
​जनगणना करणाऱ्या प्रगणकाचा (शिक्षकाचा) कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळावे.
​मृत शिक्षकाच्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर तातडीने शासकीय नोकरी देण्यात यावी.
​सुट्टीच्या दिवशी शिक्षकांना सक्तीने कामावर बोलावणे बंद करण्यात यावे.
​हक्काची सुट्टी, उन्हाचा तडाखा आणि त्यात प्रशासनाचा मानसिक ताण यामुळे शिक्षकांचा जीव जात असल्याने संपूर्ण राज्यभरातून आता शासकीय धोरणांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---