पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही यासाठी प्रशासन सज्ज; मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला पाचोरा नगरपरिषदेचा वेग…

---Advertisement---

 

पाचोरा शहरातील प्रमुख नाले, गटारींची युद्धपातळीवर स्वच्छता….

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाचोरा नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाई आणि स्वच्छता मोहिमेला वेग देण्यात आला आहे. शहरातील प्रमुख नाले, गटारी, पाण्याचा निचरा होणारे मार्ग आणि सार्वजनिक परिसरांची मोठ्या प्रमाणावर साफसफाई सुरू करण्यात आली असून पावसाळ्यात नागरिकांना पाणी तुंबणे, दुर्गंधी, डासांची वाढ आणि आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

दिनांक २५ मे २०२६ रोजी नगराध्यक्ष सुनिता किशोर पाटील यांनी नगरपरिषदेत विविध विभागांची आढावा बैठक घेत मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेच्या कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नगराध्यक्षा सुनिता पाटील यांच्या आदेशानुसार आणि मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने नालेसफाईची कामे सुरू करण्यात आली आहेत.

शहरातील अनेक भागांत जेसीबी, ट्रॅक्टर, टिपर तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाल्यांमधील गाळ, प्लास्टिक कचरा, झाडाझुडपे आणि इतर अडथळे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मागील पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा विशेष खबरदारी घेत नाल्यांमधील साचलेला गाळ काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे.

विशेषतः पावसाळ्यात पाणी साचणारे संवेदनशील भाग, मुख्य रस्त्यालगतचे नाले, बाजारपेठ परिसर, निवासी वस्त्या तसेच शाळा आणि सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरातील गटारींची प्राधान्याने स्वच्छता केली जात आहे. नालेसफाईदरम्यान बाहेर काढण्यात आलेला कचरा तात्काळ उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या कामांची नियमित पाहणी केली जात असून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरणाची कामेदेखील हाती घेण्यात आली आहेत.

नगराध्यक्षा सुनिता किशोर पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना घरगुती तसेच प्लास्टिक कचरा नाल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये, असे सांगितले आहे. नाल्यांमध्ये कचरा टाकल्यामुळे पाण्याचा निचरा अडथळित होऊन पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता राखून नगरपरिषदेच्या मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---