---Advertisement---
नवी दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Central Cabinet) बैठकीत रेशन वाटप व्यवस्थेबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. देशातील तब्बल ८० कोटी शिधापत्रिकाधारकांना (Ration Card Holders) या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे.
कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची अधिकृत माहिती दिली. रेशन वितरण प्रणाली अधिक सुलभ, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सरकारने या योजनेत ३ मोठे आणि महत्त्वाचे बदल केले आहेत.
मोदी सरकारचे ३ मोठे आणि महत्त्वाचे निर्णय:
१. राज्य सरकारांना केंद्राकडून आर्थिक मदत
भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामांमधून धान्य जिल्हा आणि तालुका पातळीवरील रेशन दुकानांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारांना मोठा खर्च करावा लागतो. अनेक राज्यांना यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता हा वाहतुकीचा खर्च सुलभ व्हावा, म्हणून केंद्र सरकार राज्य सरकारांना थेट आर्थिक मदत पुरवणार आहे.
२. रेशन दुकानदारांच्या (डीलर्स) कमिशनमध्ये वाढ
गेल्या अनेक दिवसांपासून रेशन दुकानदारांचे कमिशन वाढवण्यात यावे, अशी मागणी देशभरातून होत होती. रेशन दुकानदारांना मोठा दिलासा देत मोदी सरकारने त्यांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेशन डीलर्समधील नाराजी दूर होऊन वितरण व्यवस्था अधिक बळकट होईल.
३. रेशन व्यवस्थेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) चा वापर
रेशन वाटप प्रणालीचे पूर्णपणे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन केले जाणार आहे. या योजनेतील सर्वात मोठा बदल म्हणजे आता एआय (AI – Artificial Intelligence) तंत्रज्ञानाच्या मदतीने लाभार्थ्यांची नोंदणी केली जाईल. रेशन वाटपात होणारा काळाबाजार आणि भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा घालण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
“भारतात तब्बल ८० कोटी लोकांना रेशनचे वाटप केले जाते. ही संपूर्ण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी राज्य सरकारांना मदत, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि ‘एआय’च्या मदतीने लाभार्थ्यांची नोंदणी हे ३ महत्त्वाचे बदल कॅबिनेटने मंजूर केले आहेत.”
— अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री
या निर्णयाचा काय फायदा होणार?
८० कोटी जनतेला दिलासा: धान्य वाहतूक सोपी झाल्याने लाभार्थ्यांपर्यंत वेळेत रेशन पोहोचेल.
भ्रष्टाचाराला चाप: ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानामुळे बोगस रेशन कार्डधारक आणि धान्याची चोरी थांबेल.
दुकानदारांना अच्छे दिन: कमिशन वाढल्यामुळे रेशन दुकानदारांना आर्थिक स्थैर्य मिळेल.









